वाघाचा हल्ला; जिल्ह्यात 72 तासांत 5 महिलांचा मृत्यू!

Bhairav Diwase
1 minute read

चंद्रपूर:- जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. आज पुन्हा एकदा मूल तालुक्यातील भादूर्णा गावात वाघाच्या हल्ल्यात एक महिला मृत्युमुखी पडली. भूमिका दीपक भेंदारे (वय 28) असे मृत महिलेचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, सकाळच्या सुमारास भूमिका भेंदारे या आपल्या पतीसह व गावातील इतर महिलांसोबत जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेल्या होत्या. मात्र दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक तिच्यावर हल्ला केला. झपाट्याने घडलेल्या या हल्ल्यात तिला प्रतिकाराची संधीही मिळाली नाही. घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपास आणि पंचनामा सुरू आहे. मागील तीन दिवसांत तेंदूपत्ता गोळा करताना वाघाच्या हल्ल्यांमध्ये एकूण पाच महिलांचा मृत्यू झाला आहे.

वाघाची झडप; सासू सुनेसह एकीचा मृत्यू

चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात 3 महिलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चंद्रपुरातील सिंदेवाही तालुक्यातील मेंढा-माल गावाशेजारच्या जंगलात ही घटना घडलीय. सिंदेवाही शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या मेंढा-माल गावातील या महिला गावातील अन्य महिलांसह तेंदूपत्ता तोडायला जंगलात गेल्या होत्या. मृतक महिलांमध्ये सासू-सुनेचा समावेश, कांता बुधाजी चौधरी (65-सासू), शुभांगी मनोज चौधरी (28-सून) आणि रेखा शालिक शेंडे (50) अशी मृत महिलांची नावं आहेत.

वाघाच्या हल्ल्यात आणखी एक महिलेचा बळी

तेंदुपत्ता तोडायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला केला. यामध्ये महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी ७:३० वाजता चिचपल्ली वनपरिक्षेत्र अंतर्गत नागाळा कक्ष क्रमांक ५३७ मध्ये घडली. ग्रामीण भागात उन्हाळ्यात रोजगाराचे साधन म्हणून तेंदुपत्ता संकलनासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात जंगलात जातात. नागाळा येथील बुधाजी शेंडे रविवारी सकाळी पत्नीला घेऊन तेंदुपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेले होते. दरम्यान, दबा धरून असलेल्या वाघाने विमल शेंडे यांच्यावर हल्ला केला. जवळपास असलेल्या नागरिकांनी आरडाओरड केली असता, वाघाने पळ काढला. मात्र, विमलचा जागीच मृत्यू झाला.