चंद्रपूर:- जिल्ह्यातील रामनगर पोलिसांनी लिफ्ट देऊन प्रवाशाला लुटणाऱ्या दोन चोरट्यांना गजाआड केले आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही घटना २९ मे २०२५ रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. गोपेश गोविंद कुंडू नावाचे गृहस्थ चामोर्शी येथे जाण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील बंगाली कॅम्प येथे बसची वाट पाहत थांबले होते. त्याचवेळी शाईन मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना गाठले. त्यांनी कुंडू यांना बल्लारशाह येथे सोडण्याचे आमिष दाखवले आणि आपल्या मोटारसायकलवर बसवले. मात्र, बल्लारशाह येथे न नेता, या चोरट्यांनी कुंडू यांना जुनोना चौक ते जुनोना गाव जाणाऱ्या डांबरी रस्त्यालगतच्या जंगलातील झाडाझुडपात नेले. तिथे त्यांना मारहाण करून त्यांचा मोबाईल, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम बळजबरीने काढून घेतली. या घटनेनंतर गोपेश कुंडू यांनी तात्काळ रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, आणि त्यानुसार जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
रामनगर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. गोपनीय माहितीच्या आधारे, पोलिसांनी स्मित राजेश्वर कोटे (वय ३० वर्षे) आणि प्रकाश भुरेलाल कबीरदास (वय ३१ वर्षे), दोघे राहणार बल्लारशाह, या आरोपींची ओळख पटवली.
पोलिसांनी आरोपींच्या मागावर राहून त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीला गेलेला मोबाईल, रोख रक्कम, सोन्याचे दागिने, तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि मोबाईल असा एकूण १ लाख २८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.