जळगाव:- पोक्सोच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन शहरातील एका टायपिंग इन्स्टिट्यूट मालकाकडे तीन लाखांची मागणी करून एक लाख २० हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या शहर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा आमदार मंगेश चव्हाण यांनी पर्दापाश केला.
या प्रकरणातील तक्रारदाराला सोबत घेऊन आमदार चव्हाण यांनी तब्बल चार तास पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. अखेर खंडणी उकळणारा पोलिस कर्मचारी अजय पाटील व त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून निखिल राठोड (रा. करगाव, ता. चाळीसगाव) याच्यासह इतर तिघांविरोधात दोन दिवसांपूर्वीच गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास करताना संशयित निखिल राठोड हा स्वप्नील राखुंडे यांच्या टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये कामाला होता. त्या ठिकाणी पोलिस कर्मचारी पाटील व त्यांचा सहकारी रविवारी (ता. १८) सायंकाळी सहाच्या सुमारास गेले.
निखिल राठोडची विचारपूस करताना 'या गुन्ह्यात तुम्ही व तुमच्या कुटुंबातील सदस्यही आरोपी होऊ शकतात', असे सांगून धमकावले. पोलिस कर्मचाऱ्याने स्वप्नील राखुंडे यांना बाजूला घेऊन 'तुमच्याकडे तो मुलगा कामाला होता व तुम्ही त्याला मदत केली, म्हणून तुम्हीही या गुन्ह्यात आरोपी व्हाल' असे सांगून 'आपण मधला मार्ग काढू. मात्र, त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील', असे सांगितले. त्यावर राखुंडे यांनी एक तास वेळ द्या, असे सांगितले.
त्यानंतर राखुंडे यांनी पोलिस कर्मचारी पाटील यांच्या मोबाईलवर रात्री आठला कॉल केला असता, त्यांनी कोर्टाजवळ बोलावले. त्या ठिकाणी अजय पाटील यांच्याजवळ ५० हजार रुपये दिले. त्यावर मला अजून पैसे द्यावे लागतील, असे सांगितल्यावर मित्राकडून ५० हजार व वडिलांजवळचे २० हजार, असे ७० हजार रुपये राष्ट्रीय विद्यालयाजवळ दिले. त्याच दिवशी पोलिस ठाण्यात बोलावून नोटीसवर सही घेऊन दुसऱ्या दिवशी चौकशीसाठी पुन्हा बोलावले.