Rain News: विदर्भा नदीच्या पूरात चारचाकी वाहन गेले वाहून!

Bhairav Diwase

यवतमाळ:- कायर-पठारपूर मार्गावरील कोसारा घाटातील पुलावर मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी आले आहे. याठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने चारचाकी वाहनासह दोन जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली. त्यापैकी एकाला वाचविण्यात यश आले तर एकाचा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवार दि. २७ मे रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. रामा कनाके (वय ५५) रा. उमरी असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.

मंगळवारी सायंकाळी जोरदार पाऊस पडल्याने विदर्भा नदीला पूर आला. यावेळी कायर-पठारपूर मार्गावरील कोसारा घाटातील पुलावरून पुराचे पाणी वाहू लागले. याच दरम्यान झरी तालुक्यातील डोंगरगाव येथील उमरीकडे चारचाकी वाहन येत होते. पुलावरून पाणी वाहत असताना चालकाने नदीचा पूल पार करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, पाण्याच्या प्रवाहाचा वेग प्रचंड असल्याने वाहन नदीच्या प्रवाहात वाहून गेले. यावेळी चालकाच्या बाजूच्या सीटवर बसलेल्या भास्कर कुसाम (वय ५०) याने वाहनातून उडी मारली. त्यामुळे त्याचा जीव वाचला तर वाहन चालक रामा कनाके याला बाहेर पडणे शक्य न झाल्याने त्याचा नदीत बुडून मृत्यू झाला. विदर्भा नदीला पूर आल्याने गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात नदीच्या पुलाजवळ जमा झाले होते. उपस्थितांपैकी काही लोकांनी पोलिसांना संपर्क केला.

शिरपूर पोलिस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने नदीत वाहून जाणाऱ्या एकाला वाचविले तर एक जण वाहनासह वाहून गेला. त्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत नदी पात्रात शोध मोहीम राबविली. पोलिसांनी पहाटे ३ वाजता वाहन चालकाचा मृतदेह नदी बाहेर काढला. रामा कनाके याच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा आप्त परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.