Sindewahi Crime News: सिंदेवाहीत दहशतीचा कट उधळला! तलवारीसह आरोपी जेरबंद

Bhairav Diwase


सिंदेवाही:- चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथे दहशत पसरवण्याच्या उद्देशाने हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणाला सिंदेवाही पोलिसांनी अटक केली आहे. शिवराज सुनील उटलवार, रा. विद्यानगर कॉलनी, सिंदेवाही असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आज दिनांक १७ जून २०२५ रोजी ५:०० ते ५:४५ वाजण्याच्या सुमारास सिंदेवाही शहरातील पेट्रोलिंग सुरू असताना, पोलिसांनी पानठेल्याजवळ अंधाराचा फायदा घेऊन एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याच्या हातात एक धारदार तलवार आढळून आली. आरोपी शिवराज उटलवार हा शहरात घातपात करून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने ही तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी सिंदेवाही पोलिसांनी आरोपीविरोधात अप. क्रमांक- २१३/२०२५, कलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा सह कलम १२२ मपोका अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस करत आहेत.

सदरची ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. विजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली सपोनि. चंद्रभान सोनवणे व इतर कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.