Rajura police: राजुरा येथे अवैध तलवार बाळगणाऱ्या एकाला अटक

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा पोलिसांनी एका युवकाला अवैध तलवार बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. त्याच्याकडून एक लांब लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, काल, म्हणजेच २६ जुलै २०२५ रोजी राजुरा पोलिसांना एका गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली. रेल्वे वसाहत समोरील परिसर, सोनिया नगर, राजुरा येथे एक व्यक्ती अवैधरित्या तलवार बाळगून असल्याची ही माहिती होती.


या माहितीच्या आधारे, पोलिसांनी तात्काळ संबंधित ठिकाणी पंचांसमक्ष छापा टाकला. त्यावेळी अकिब नासिर खान (वय १९ वर्षे, रा. चुनाभट्टी वॉर्ड, राजुरा) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या जवळून ८१ सेंटीमीटर लांबीची एक चमकदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. अकिब नासिर खान याच्याविरुद्ध राजुरा पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक ३४६/२०२५, कलम ४, २५ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजुरा पोलीस करत आहेत.


ही कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे आणि प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. राजुराचे ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री. सुमित परतेकी यांच्या नेतृत्वात पोउपनि भिष्मराज सोरते, सफौ किशोर तुमराम, पोहवा विक्की निर्वाण, रामेश्वर चहारे, पोशि शफीक शेख, महेश बोलगोडवार, शरद राठोड, आनंद मोरे, बालाजी यामलवार, अविनाश बांबोळे आणि राजीव दुबे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.