Sudhir Mungantiwar : "सुधीरभाऊंच्या अनुभवाची गरज": शिवेंद्रराजे भोसलेंच्या वक्तव्याने चर्चांना जोर?

Bhairav Diwase

चंद्रपूर:- भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार पुन्हा मंत्रिमंडळात परतणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. त्यांना विधानसभेचे अध्यक्षपदसुद्धा दिले जाऊ शकते याचीही चर्चा रंगली आहे. त्यांच्या मंत्रिमंडळाच्या प्रवेशाबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मोठे संकेत दिले. सुधीरभाऊ अनुभवी व अभ्यासू नेते आहेत. उत्कृष्ट संसदपटू आहेत. त्यांच्या अनुभवाची सर्वांनाच गरज आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे पुन्हा भाऊंच्या मंत्रिमंडळाच्या समावेशाच्या चर्चांनी जोर धरला आहे.


शिवेंद्रराजे भोसले यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या घरी भेट दिली. यावेळी पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी उपरोक्त संकेत दिले. ते म्हणाले आपली भेट फक्त औपचारिक नाही. पक्षातील समन्वय, शिस्त आणि वरिष्ठ नेत्यांबाबत आदरभावाने आपण मुनगंटीवार यांची भेट घेतली.


सुधीरभाऊ फक्त आमदार किंवा माजी मंत्री नाहीत. त्यांची प्रभावशाली शैली आणि विधिमंडळातील अभ्यासपूर्ण भाषणातून आम्ही नेहमीच शिकत असतो. अधिवेशनात किंवा मंत्रालयात एखादा विषय येतो तेव्हा त्यावर सुधीरभाऊ यांची काही टिपणी असेल तर तो मंत्री असो वा अधिकारी कोणालाच टाळता येत नाही. त्यांची फाईल रोखण्यापूर्वी सनदी अधिकाऱ्यांनाही विचार करावा लागतो. भाजपमध्ये नेहमीच वरिष्ठ व अनुभवी नेत्यांचा मान राखला जातो असेही भोसले म्हणाले.