BJP Mahanagar Chandrapur: चंद्रपूर भाजप महानगर कार्यकारिणी जाहीर होताच उपाध्यक्षांचा राजीनामा

Bhairav Diwase

चंद्रपूर:- भारतीय जनता पार्टीच्या चंद्रपूर महानगर कार्यकारिणीच्या घोषणेनंतर स्थानिक भाजपमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी जाहीर केलेल्या नवीन कार्यकारिणीवर आक्षेप घेत, माजी नगरसेवक राजेंद्र अडपेवार यांनी त्यांच्या शहर उपाध्यक्ष पदाचा तातडीने राजीनामा दिला आहे.


दलबदलूंना स्थान, निष्ठावंतांवर अन्याय?

अडपेवार यांनी आपल्या राजीनाम्याचे कारण स्पष्ट करताना म्हटले आहे की, "ज्यांनी सातत्याने पक्ष बदलले आणि ज्यांच्या निष्ठा नेहमीच संशयाच्या भोवऱ्यात राहिल्या, अशा दलबदलूंना कार्यकारिणीत महत्त्वाची पदे देण्यात आली आहेत." याउलट, "गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय आणि अवहेलना होत आहे." ही कार्यकारिणी निष्ठावंतांवर अन्याय करणारी असून, दलबदलूंना बक्षीस देणारी असल्याचा थेट आरोप त्यांनी केला.

महत्त्वाच्या पदांवर दलबदलूंना संधी?

३ ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या या कार्यकारिणीत, यंग चांदा ब्रिगेडमधून आलेल्या, शिवसेनेतून भाजपवासी झालेल्या आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधून पुन्हा भाजपमध्ये परतलेल्या व्यक्तींना महामंत्री, उपाध्यक्ष, सचिव आणि निमंत्रित सदस्य अशी महत्त्वाची पदे देण्यात आली आहेत. पक्षासाठी अनेक वर्षे काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना मात्र डावलण्यात आल्याने अडपेवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.


निष्ठावंतांची गरज उरलेली नाही?

आपल्या राजीनाम्याची प्रत पक्षाचे ज्येष्ठ नेते हंसराज अहीर, आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांना पाठवताना अडपेवार यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्यांनी म्हटले की, "मी ३०-३५ वर्षांपासून पक्षाची निष्ठेने सेवा केली आहे, पण सध्याच्या धोरणांमुळे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची भावना दुखावली आहे." या कार्यकारिणीकडे पाहून, "पक्षाला आता निष्ठावान कार्यकर्त्यांची गरज उरलेली नाही, असे वाटू लागले आहे," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.



राजकीय वर्तुळात खळबळ?

अडपेवार हे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या गटाचे मानले जातात. सद्यस्थितीत अहीर हे आमदार किशोर जोरगेवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे, अडपेवार यांच्या या राजीनाम्यामुळे चंद्रपूर भाजपमध्ये मोठे वादळ उठले आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आणखी काही पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा भाजपच्या वर्तुळात सुरू आहे. यामुळे आगामी काळात भाजपला अंतर्गत गटबाजीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.