Viral video: ऑफिसमध्ये सुरु होता 'पत्यांचा डाव'; एका व्हिडिओने केला 'गेम ओव्हर

Bhairav Diwase

भद्रावती:- शासकीय कार्यालयात नागरिकांच्या कामासाठी नियुक्त केलेले कर्मचारी कार्यालयीन वेळेत संगणकावर 'पत्ते' खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार भद्रावती पंचायत समितीमध्ये समोर आला आहे. पंचायत समिती कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचा संगणकावर बसून पत्ते खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये काय आहे?

व्हिडिओमध्ये, संबंधित कर्मचारी कार्यालयाच्या वेळेत संगणकावर 'गेम्स'च्या माध्यमातून पत्त्यांचा खेळ खेळत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. एका युवकाने हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये चित्रित करून समाजमाध्यमांवर शेअर केल्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


प्रशासनाची प्रतिक्रिया?

या घटनेबद्दल भद्रावती पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांनी हा व्हिडिओ कृषी विभागातील असल्याचे स्पष्ट केले आहे. "हा प्रकार अत्यंत गंभीर असून, संबंधित कर्मचाऱ्यावर निश्चितच कारवाई केली जाईल. याबाबतचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल," असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, कार्यालयीन वेळेमध्ये जनतेची आणि शासकीय कामे प्राधान्याने पार पाडणे अपेक्षित आहे, त्यामुळे असे वर्तन निषेधार्ह आहे.


नागरिकांमध्ये संताप?

स्थानिक नागरिकांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे आणि अशा कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. "सरकारी कर्मचारी जर जनतेच्या कामापेक्षा स्वतःच्या करमणुकीला प्राधान्य देत असतील, तर हा कामकाजाचा दर्जा धोकादायक आहे," अशी प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे.

प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतल्याने भविष्यात अशा घटनांना आळा बसेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. सरकारी कार्यालयांमधील शिस्त आणि जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे नागरिकांनी अधोरेखित केले आहे.