चंद्रपूर:- रेल्वे गेट G-39 वर वारंवार होणाऱ्या बंदीने त्रस्त नागरिकांनी शनिवारी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. दुपारी १२ ते ३ या वेळेत स्थानिक महिला लहान मुलांसह पाण्याने भरलेल्या खड्ड्यांत बसून रेल्वे व वेकोलि प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांचा रोष एवढा वाढला की भाजप चंद्रपूर शहराध्यक्षांच्या रुग्णवाहिकेलाही गेट पार होऊ दिले नाही. परिस्थिती तणावपूर्ण होताच घुग्घुस पोलिस व दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले.
घुग्घुस परिसरातील वेकोलि कोळसा खाणींमधून दररोज हजारो टन कोळसा देश-राज्यातील वीज प्रकल्पांना पाठवण्यासाठी रेल्वे मार्गाचा वापर होतो. राजीव रतन चौकाजवळील G-39 रेल्वे गेट हा मुख्य मार्ग असून दिवसरात्र मालगाड्यांची वर्दळ असते. कोळशाच्या ओव्हरलोड गाड्यांमुळे गेट दीर्घकाळ बंद राहतो, परिणामी शाळकरी मुले, पादचारी व वाहनचालक तासन्तास अडकून पडतात. या गेटवर याआधीही अनेक जीवघेणे अपघात झाले आहेत.
घटनेदरम्यान RPF अधीक्षक बलवीर सिंह, बल्लारशाहचे अभियंता सुभोद कुमार, महारेलचे DGM पी. श्रीकांत व घुग्घुस ठाणेदार प्रकाश राऊत यांनी आंदोलनस्थळी पोहोचून नागरिकांशी चर्चा केली. आंदोलनाचं नेतृत्व माला मेश्राम यांनी केलं. प्रशासनाने लिखित आश्वासन दिले की २६ ते २८ ऑगस्टदरम्यान रेल्वे फ्लायओव्हर ब्रिजचे काम सुरू होईल आणि पावसाळ्यानंतर पुलाखालची सर्विस रोड पूर्ण केली जाईल.
स्थानिकांनी स्पष्ट केले की, यापूर्वीही अशी अनेक आश्वासने देण्यात आली, पण कामाला सुरुवात झाली नाही. यावेळी जर ठरलेल्या वेळेत काम सुरू झाले नाही, तर आणखी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल.