चंद्रपूर:- वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) च्या भटाडी ओपन कास्ट खाणीत कार्यरत असलेल्या कावेरी C.5 कंपनीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने कामगारांचे शोषण करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या कंपनीत गेल्या दोन वर्षांपासून सुमारे 300 ते 350 कामगार ज्यात ड्रायव्हर, सुपरवायझर, क्लीनर आणि हेल्पर यांचा समावेश आहे. काम करत आहेत, परंतु त्यांना नियमानुसार पगार दिला जात नाही आणि कंपनी त्यांचे भविष्य निर्वाह निधी (P.F.) सुद्धा जमा करत नसल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.
या गंभीर गैरव्यवहाराची तक्रार कामगारांनी केंद्रीय कामगार कार्यालयात केली असून, तिथे योग्य कार्यवाही होत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी या कार्यालयातील अधिकाऱ्यांवर कंपनीशी संगनमत करून कामगारांच्या शोषणाला पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे.
गिऱ्हे यांनी या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी करत, जर येत्या 7 दिवसांत कामगारांना न्याय मिळाला नाही, तर कामगार कार्यालयावर 'शिवसेना स्टाईल' मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.