जरांगे यांच्या प्रतिमेला चपला मारून निषेध
चंद्रपूर:- मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता राज्यात मराठा आणि ओबीसी समाजातील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र होताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून आज चंद्रपूर शहरात ओबीसी समाजाने मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा तीव्र निषेध नोंदवला.
चंद्रपूर शहरातील वरोरा नाका चौकात ओबीसी समाजाच्या वतीने एक जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने ओबीसी कार्यकर्ते जमले होते. आंदोलकांनी मनोज जरांगे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यांच्या प्रतिमेला चपला मारून आपला निषेध व्यक्त केला.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. अशोक जीवतोडे यांनी मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर तीव्र टीका केली. ते म्हणाले, "मनोज जरांगे हे काही विशिष्ट राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून आंदोलन करत असून त्यांचा उद्देश केवळ मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करणे आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन राज्यातले वातावरण बिघडवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे."
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीला त्यांनी ठाम विरोध दर्शवला. जीवतोडे यांनी स्पष्ट केले की, ज्यांच्याकडे 'कुणबी' असल्याच्या नोंदी आहेत, त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र दिले जावे. मात्र, सरसकट सर्व मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देणे हे अयोग्य आहे आणि ते ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गदा आणणारे आहे. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, ओबीसी समाजाच्या आरक्षणात कोणताही वाटा मान्य नाही.
या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे, आणि ओबीसी समाजाने आपली भूमिका अधिक आक्रमकपणे मांडायला सुरुवात केली आहे.