Sp college Chandrapur : 'इंडिया टुडे' मानांकनामध्ये सरदार पटेल महाविद्यालयाला यंदाही स्थान

Bhairav Diwase

चंद्रपूर:- 'इंडिया टुडे' या नामांकित मासिकातर्फे दरवर्षी महाविद्यालयाचे शाखानिहाय मूल्यांकन स्वयंप्रेरणेने करण्यात येते. अलीकडेच २०२४-२५ सत्रासाठी देखील 'इंडिया टुडे' ने मूल्यांकन करून राष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयातील शाखांच्या मानांकनामध्ये येथील सरदार पटेल महाविद्यालयातील सर्वच शाखांना मानांकनात स्थान मिळाले आहे. सर्वोत्कृष्ट मानांकनात मागील वर्षीच्या तुलनेत महाविद्यालयातील कला, विज्ञान व वाणिज्य विभागाने यंदा भरारी घेत वरचे स्थान पटकाविले आहे.



पालकांना आपल्या पाल्याला प्रवेश देताना उत्कृष्ट महाविद्यालय निवडण्यासाठी या मानांकनाचा उपयोग होतो. हे मानांकन ठरवताना 'इंडिया टुडे' मासिकातर्फे महाविद्यालयात उपलब्ध सोयी सुविधा, इमारत, विद्यार्थ्यांचा परीक्षेतील गुणानुक्रम, उपलब्ध प्राध्यापकांची संख्या, शैक्षणिक व इतर उपक्रम, विद्यार्थ्यांना दिलेल्या नोकरी विषयक संधी, प्रशिक्षण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न, अभ्यासक्रमाची पातळी इत्यादी बाबींचा अहवाल मागविण्यात येतो. त्या आधारावर या मानांकनाची क्रमवारी प्रसिद्ध करण्यात येते. नुकतीच ती 'इंडिया टुडे' च्या ३० जून २०२५ च्या विशेष अंकात प्रकाशित करण्यात आली आहे. २०२४ च्या तुलनेत कला शाखेचे मानांकन १७० वरून १६४ वर, विज्ञान शाखेचे मानांकन ११७ वरून ११० वर, तर वाणिज्य शाखेचे मानांकन १४० वरून १३९ वर जाहीर झाले आहे.
फॅशन विभागाला ५४, तर जनसंवाद विभागाला राष्ट्रीय स्तरावर ५८ वा क्रमांक मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे.


किमान प्रवेश शुल्क आकारणाऱ्या देशातील पहिल्या १० मध्ये महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागाचा बीसीए हा अभ्यासक्रम पहिल्या दहात चौथ्या क्रमांकावर, जनसंवाद विभागाचा एम.एम.(मास कम्युनिकेशन) हा अभ्यासक्रम पहिल्या दहा मध्ये चौथ्या स्थानावर आहे. यातच वाणिज्य विभागही पहिल्या दहात सातव्या क्रमांकावर आहे.


महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सतत सहयोग देणारे सर्वोदय शिक्षण मंडळ यांच्या सामूहिक प्रयत्नांची ही फलश्रुती असल्याचे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर यांनी व्यक्त केले. हे सर्व अहवाल तयार करण्यासाठी उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रकाश शेंडे, डॉ. विजय वाढई, डॉ. एस.बी. किशोर, डॉ. राहुल सावलीकर, डॉ. पंकज मोहरीर, डॉ.अनिता मत्ते यांनी ही पूर्ण प्रक्रिया पार पाडली.


दरम्यान दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जिनेश पटेल यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर व त्यांच्या चमूचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.