चंद्रपूर:- गणपती विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने चंद्रपूर शहरात भारतीय जनता पक्षात (भाजप) असलेला अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील मुख्य मार्गावरून बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात काढण्यात आल्या. या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या गणेशभक्तांचे स्वागत करण्यासाठी अनेक राजकीय पक्ष आणि संस्थांचे मंडप रस्त्यांच्या कडेला उभारण्यात आले होते. आजवर भाजपतर्फे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याच वतीने मंडप उभारला जायचा. मात्र, यंदा स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी आपला स्वतंत्र मंडप उभारल्याने मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील शीतयुद्धाला जाहीर स्वरूप आल्याचे दिसून आले.
गेल्या काही वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपची धुरा प्रामुख्याने सुधीर मुनगंटीवार यांच्या हाती होती. मात्र, राज्याच्या मंत्रिमंडळातून त्यांचे स्थान गेल्यानंतर पक्षातील अनेक स्थानिक नेत्यांनी आणि आमदारांनी त्यांची साथ सोडल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर, आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजपच्या शहर अध्यक्षपदाचा मान आपल्या गटाला मिळवून शहराच्या राजकारणात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे चंद्रपूरमध्ये आपणच पक्षाचे प्रमुख आहोत, असा संदेश ते देत आहेत.
याच वर्चस्वाच्या लढाईत, दरवर्षी भाजपचा जो एकत्रित मंडप असायचा तो आपणच लावणार, अशी भूमिका घेत मुनगंटीवार यांनी थेट जोरगेवार यांना आव्हान दिले. त्यांच्या या भूमिकेला प्रत्युत्तर म्हणून जोरगेवार यांच्या समर्थकांनीही त्याच परिसरात दुसरा मंडप उभारला. त्यामुळे आजवर शिस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या भाजपमधील हा उघड कलह गणेशभक्तांसह सर्वसामान्य नागरिकांनीही पाहिला.
या संपूर्ण घटनेवर दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर थेट टीका करणे टाळले. आपल्या कृतीचे समर्थन करताना त्यांनी 'परंपरा कायम ठेवल्या'चे सांगितले. पण, या घटनेमुळे भाजपमधील दुफळी समोर आली असून, येणाऱ्या काळात या दोन्ही गटांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


