सरपंच संजना बोंडे यांनी सांगितले की, सांगोडा ग्रामपंचायत ही सात सदस्यांची एक छोटी ग्रामपंचायत आहे. त्यांचे पती सचिन बोंडे यांनी मागील पाच वर्षांपासून सरपंच म्हणून काम केले आहे आणि त्यांनी स्वतः साडेचार वर्षांसाठी सरपंचपदाचा कार्यकाळ यशस्वीरीत्या सांभाळला आहे. या साडेनऊ वर्षांच्या काळात गावात अनेक विकासकामे झाली आहेत.
काही तरुणांनी वारंवार बिनबुडाचे आरोप करून तक्रारी दाखल केल्या आहेत. यापूर्वीही अशा तक्रारींची चौकशी झाली असून, सरकारी चौकशीत एकही आरोप सिद्ध झाला नाही. संजना बोंडे यांनी सांगितले की, त्या एक महिला सरपंच असल्यामुळे त्यांना टार्गेट केले जात आहे आणि हे आरोप केवळ राजकीय मतभेदातून केले जात आहेत. विरोधक जाणूनबुजून ग्रामसभा आणि मासिक सभांमध्ये गोंधळ घालून विकासकामांना अडथळा आणण्याचा आणि त्यांची वैयक्तिक बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
संजना बोंडे म्हणाल्या की, त्यांचा कार्यकाळ पुढील चार महिन्यांत संपत आहे आणि त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. त्यामुळेच विरोधकांनी हा तक्रारींचा खेळ सुरू केला आहे. त्यांनी आणि त्यांच्या पतीने गावात केलेली सर्व कामे शासकीय नियमांनुसारच आहेत.
शुभम ढवस आणि त्यांच्यासोबतच्या लोकांविरोधात कोरपना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सरपंच बोंडे यांच्या मते, हे प्रकरण केवळ वैयक्तिक सूड आणि राजकीय स्वार्थापोटी निर्माण केले गेले आहे. या पत्रकार परिषदेला सरपंच संजना सचिन बोंडे, माजी सरपंच सचिन बोंडे, सदस्य विजय लक्ष्मण लांडे, नवनाथ ढवस, बंडू भगत आदी उपस्थित होते.