Suicide News: "मुख्यमंत्री साहेब आम्हाला..."; आरक्षणाच्या लढाईचा आणखी एक बळी; बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

Bhairav Diwase

धाराशिव:- मराठा आरक्षणाच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र याच हैदराबाद गॅजेटमधील नोंदीनुसार सध्या ओबीसी प्रवर्गात असलेल्या बंजारा समाजाचा समावेश एसटी (अनुसूचित जमातीमध्ये) प्रवर्गामध्ये करावा, ही मागणी आता राज्यात जोर धरू लागली आहे. या मागणीसाठी विविध नेत्यांकडून आवाज उठवला जात असताना धाराशिवमध्ये धक्कादायक घटना घडली असून आरक्षणाच्या मागणीसाठी एका तरुणाने आपले जीवन संपवलं आहे.

एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी बंजारा समाज जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय येथे निवेदने देऊन मागणी करत आहे. मात्र धाराशिव जिल्ह्यातील मुरूम शहरातील नाईक नगर तांडा येथील पवन गोपीचंद चव्हाण या 32 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने मुख्यमंत्र्‍यांना उद्देशून चिठ्ठी लिहिली आहे. बंजारा समाजाचा हैदराबाद गॅजेटच्या तरतुदीनुसार एसटी प्रवर्ग म्हणजेच अनुसूचित जमातीमध्ये समावेश करा, अशी मागणी या चिठ्ठीतून पवन चव्हाण यांनी केली.


पवन चव्हाण हे बंजारा समाजाच्या वेगवेगळ्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचे. गेल्या आठ दिवसांमध्ये बंजारा समाजाच्या झालेल्या आंदोलनामध्ये पवन चव्हाण अग्रेसर असायचे. मात्र आरक्षणाच्या मागणीसाठी आता त्यांनी थेट मृत्यूला कवटाळले. पवन चव्हाण यांनी आत्महत्या केली आहे असे समजतात बंजारा समाजातील विविध लोकांनी घटनास्थळी भेट देत कुटुंबाचे सांत्वन केले. या प्रकरणाचा तपास मुरूम पोलीस करत आहेत.