Nilesh Belkhede: गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा!

Bhairav Diwase
मार्कशीटवर आता CGPA सोबतच टक्केवारीची नोंद मिळणार

चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी! आता विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणपत्रिकेवर (CGPA) सोबतच थेट टक्केवारीची (Percentage) नोंद करण्यात येणार आहे. युवासेना विभागीय सचिव आणि सिनेट सदस्य प्रा. निलेश बेलखेडे यांनी केलेल्या मागणीला यश मिळाले असून, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. निलेश बेलखेडे यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचे अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न मांडले.


यामध्ये, विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर CGPA सोबतच टक्केवारीचा रकाना समाविष्ट करण्याची मागणी प्रमुख होती. सध्या, बाहेरील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना टक्केवारीची गरज असते, यासाठी त्यांना विद्यापीठाकडून रूपांतरण प्रमाणपत्र (Conversion Certificate) घेण्यासाठी वेगळे २००/- रुपये शुल्क भरावे लागत होते. तसेच, वेळेवर प्रमाणपत्र न मिळाल्यास प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती होती.


यावर तोडगा काढत, प्रा. बेलखेडे यांनी गुणपत्रिकेवरच टक्केवारी नोंदवण्याची मागणी केली. कुलगुरूंनी यावर सकारात्मकता दर्शवत, येत्या हिवाळी किंवा उन्हाळी परीक्षेपासून विद्यार्थ्यांना अशा पद्धतीची सुधारित गुणपत्रिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

या बैठकीत इतरही अनेक महत्त्वाचे विषय चर्चेला आले. यात-
  • गोंडवाना अंतर्गत मॉडेल कॉलेजमधील अभ्यागत प्राध्यापकांचे (Visiting Faculty) २०२३-२४ चे थकीत वेतन त्वरित देणे.
  • पीएच.डी. विद्यार्थ्यांचे नोटिफिकेशन लवकरात लवकर प्रसिद्ध करणे, तसेच सर्व प्रक्रिया पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रलंबित (Pending) तात्पुरत्या पदव्या (Provisional Degrees) त्वरित उपलब्ध करून देणे.
  • परीक्षा केंद्रांमध्ये सुधारणा करणे आणि परीक्षा पद्धतीमधील केंद्रात सुधारणा करणे.
  • विद्यापीठ परीक्षा विभागात होणाऱ्या दिरंगाईमुळे विद्यार्थी-शिक्षकांना होणाऱ्या अडचणी दूर करणे.

आमदार अडबाले यांनी विद्यापीठ प्रशासनाला या सर्व समस्या तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश दिले. कुलगुरू बोकारे, प्र. कुलगुरू कावळे आणि इतर अधिकाऱ्यांनी सर्व विषय येत्या काही दिवसांत निकाली काढण्याचे आश्वासन दिले आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल प्रा. निलेश बेलखेडे यांनी आमदार अडबाले सर आणि विद्यापीठाच्या सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले.