Gadchandur News: भाजपविरोधात निवडणूक लढवल्याने पक्षशिस्त भंगाची कारवाई!

Bhairav Diwase
कोरपना:- नगरपालिकेच्या आगामी नगराध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीमध्ये (भाजप) मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणाऱ्या सात पदाधिकाऱ्यांवर पक्षाने तात्काळ निष्कासनाची (Expulsion) कारवाई केली आहे.

भाजपचा विरोध पत्करून काही पदाधिकाऱ्यांनी शेतकरी संघटना व शहर विकास आघाडीकडून उमेदवारी दाखल केली होती. पक्षाच्या शिस्तपालन समितीने या कृतीची गंभीर दखल घेत, हे कृत्य 'पक्षशिस्त व अनुशासन भंग' करणारे असल्याचा ठपका ठेवला आहे.

कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, निलेश ताजने, रामसेवक मोरे, संदिप शेरकी, महादेव एकर, महादेव जयस्वाल, शेख इम्रान शेख पाशा आणि योगेंद्र केवट या सात पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे अधिकृत आदेश डावलून निवडणूक लढवल्यामुळे त्यांची तात्काळ पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे.

या कारवाईमुळे गडचांदूरच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, आगामी निवडणुकीवर याचा काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या कारवाईची प्रत विभाग संघटन मंत्री, विदर्भ विभाग आणि जिल्हाध्यक्ष, चंद्रपूर ग्रामीण यांना पाठवण्यात आली आहे.