पोंभूर्णा:- गावातील गुन्हेगारीला आळा घालणे, माहिती संकलन करणे, गावातील तंटे गावातच सोडविण्यासाठी पोलिस प्रशासनासोबत संवाद ठेवणे, इत्यादी कामांसाठी पोलिस पाटील पदाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मात्र तालुक्यातील १३ गावांत पोलिस पाटील पद रिक्त असल्याने कायदा-सुव्यवस्था राखण्यास अडचणी निर्माण झाल्या. भांडण-तंटे वाढले. अन्याय वा संकट प्रसंगी दाद कुठे मागायचे, असाही प्रश्न नागरिक विचारत आहेत.
पोंभुर्णा तालुक्यातील चेक फुटाना, जुनगाव, आंबई तुकूम, चेक घनोटी न. १, देवई, बोर्डा दीक्षित, चेक ठाणा, चेक कोसंबी, देवाडा खुर्द, चेक आष्टा, डोंगर हळदी तुकुम, वेळवा, खरमत इत्यादी १३ गावात 'पोलिस पाटीलचे पद रिक्त आहे. पदभरतीसाठी सतत मागण्या होत आहे.
प्रशासनाकडून भरती प्रक्रिया रेंगाळत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. गुन्हेगारी नियंत्रण, माहिती संकलन आणि तंटे निवारण करण्यासाठी पोलिस पाटलाची महत्त्वाची भूमिका असते. याबाबत ठाणेदार राजकमल वाघमारे यांना विचारले असता, रिक्त पदांबाबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.
१३ गावांत पोलिस पाटीलचे पद रिक्त असल्याने संबंधित गावपातळीवरील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. शासनाने पोलिस पाटील भरतीची प्रक्रिया सुरू करावी.
अविनाश वाळके


