गोंडपिपरी:- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोंडपिपरी तालुक्यात भाजपविरोधी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत ‘वज्रमुठ’ बांधली आहे. धनशक्ती व जातीय शक्तीचा मुकाबला करण्यासाठी आम्ही एकसंघ होऊन भाजपचा कोणत्याही परिस्थितीत पराभव करू, असा निर्धार सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केला. Gondpipari News
दि.(८) रविवारी गोंडपिपरी येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट), शेतकरी संघटना, शिवसेना (उबाठा), गोंडवाना गणतंत्र पक्ष या घटकपक्षांचा सहभाग होता. बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका एकत्रितपणे व पूर्ण ताकदीने लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. Gondpipari
राजुरा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर भाजपने सत्तेची अनेक केंद्रे आपल्या ताब्यात घेतली आहेत. त्यामुळे समविचारी पक्षांनी एकत्र येऊन संघटित लढा देणे आवश्यक असल्याचे मत सर्वपक्षीय बैठकीत मांडण्यात आले. Chandrapur News
बैठकीला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक रेचनकर, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष भारत चंद्रागडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेश कवठे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रामकृष्ण सांगडे, गोंडवाना गणतंत्र पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदीप कुळमेथे, शिवसेना तालुकाप्रमुख सुरज माडूरवार आदी प्रमुख नेते उपस्थित होते. Chandrapur
भाजप पक्ष धनशक्तीचा वापर मोठ्या प्रमाणावर करीत असून मतदान प्रक्रियेतही अनैतिक युक्त्या वापरल्या जात आहेत, असा आरोप वक्त्यांनी केला. आता एकसंघ राहूनच या शक्तींना प्रत्युत्तर देणे आवश्यक असल्याचे सर्वांनी मत व्यक्त केले. सर्वपक्षीय समन्वयासाठी ‘कोअर टीम’ स्थापन करून सर्वसमावेशक निर्णय घेण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली.बैठकीस शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.


