Bhadrawati News: भद्रावती निकाल: भाजपला दोनच जागा, पण एका जागेवर 'काटे की टक्कर'

Bhairav Diwase

वृषाली ठरल्या 'जायंट किलर'


भद्रावती:- निवडणूक कोणतीही असो, प्रत्येक मत महत्त्वाचे असते, याचा प्रत्यय चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगरपरिषदेच्या निकालातून आला आहे. येथे विजय आणि पराभवामध्ये केवळ एका मताचे अंतर राहिले असून, नशिबाने भाजपच्या उमेदवाराला साथ दिली आहे.


भद्रावती नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 12 (ब) मध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली. भाजपच्या उमेदवार वृषाली विनोद पांढरे आणि काँग्रेसच्या उमेदवार कल्पना विनोद मत्ते यांच्यात शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीची लढत झाली. जेव्हा मतमोजणी पूर्ण झाली, तेव्हा समोर आलेले आकडे थक्क करणारे होते.


काँग्रेसच्या उमेदवाराला ७०७ मते मिळाली, तर भाजपच्या वृषाली यांनी ७०८ मते मिळवत केवळ एका मताच्या फरकाने विजयावर मोहोर उमटवली. विशेष म्हणजे, या निवडणुकीत भद्रावतीमध्ये भाजपचे केवळ दोनच नगरसेवक निवडून येऊ शकले आहेत. त्यापैकी एक विजय हा असा 'थ्रिलर' पद्धतीने मिळाल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा रंगली आहे.


"एका मताने उमेदवाराचे नशीब कसे पालटते, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे. विजयानंतर वृषाली यांनी मतदारांचे आभार मानले असून, 'एक मत सुद्धा सत्ता बदलू शकते' हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.