चंद्रपूर:- चंद्रपूर शहराच्या वैभवाचा देदीप्यमान वारसा असलेल्या ऐतिहासिक जटपुरा गेटवर मोठ्या प्रमाणात धार्मिक व संतांच्या फोटोंचे बॅनर लावण्यात आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. हा गेट चंद्रपूरच्या गोंडकालीन किल्ल्याचा एकमेव उरलेला भव्य प्रवेशद्वार असून, तो राज्याच्या पुरातत्त्व विभागाकडे संरक्षित वास्तू म्हणून नोंदवला गेला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये जटपुरा गेटच्या भिंतींवर मोठे-मोठे फ्लेक्स व बॅनर चिकटवलेले दिसत आहेत. याबाबत जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा काँग्रेस नेते जि. चंद्रपूर श्री. सुरज ठाकरे यांनी ऐतिहासिक वास्तूच्या संरक्षणाकरिता /जागृती करिता फेसबुकवर पोस्ट करत-
“बॅनरच्या नगरीत आपले स्वागत..! संतांचे बॅनर लावल्याने तुम्ही खूप मोठे भक्त होत नाही, त्यांचे विचार अंगीकृत करा. हे ऐतिहासिक वारसे नासधूस करणे थांबवा.”
अशी पोस्ट करत कार्यवाही करिता चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक (SP Chandrapur) तसेच चंद्रपूर महानगरपालिकेकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
• या ऐतिहासिक वास्तूचे महत्त्व:-
जटपुरा गेट हे १७ व्या शतकातील गोंड राजवंशाच्या कालखंडातील असून, चंद्रपूर किल्ल्याचे एकमेव जिवंत साक्षीदार आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (ASI) याला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. अशा वास्तूंवर कोणतेही बॅनर, पोस्टर, जाहिरात किंवा धार्मिक चिन्हे लावणे कायद्याने गुन्हा आहे (महाराष्ट्र प्राचीन स्मारक व पुरातत्त्व स्थळे आणि अवशेष अधिनियम, १९६०).
मोठमोठ्या संतांनी व महापुरुषांनी सांगितले की-
“एखाद्या व्यक्तीच्या किंवा संतांच्या भक्तीचा आदर 'त्यांच्या विचारांमध्ये दाखवावा, वास्तूंच्या भिंती रंगवून नव्हे. आज जटपुरा गेटवर जे बॅनर लावले गेले, उद्या कुणी दुसऱ्या धर्माचे बॅनर लावले तर? मग वारसा काय राहील?”
संबंधित जबाबदार शासकीय अधिकाऱ्यांना ही सर्व बाप स्पष्ट डोळ्यासमोर असताना देखील हवी ती कारवाई करीत नसल्यामुळे शहरात प्रशासनाची वचक राहिलेली नाही.
श्री. सुरज ठाकरे यांनी खालील कारवाईची मागणी केली आहे:-
- संबंधित बॅनर तात्काळ काढून टाकावेत.
- जबाबदार व्यक्ती/संघटना यांच्यावर महाराष्ट्र प्राचीन स्मारक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा.
- भविष्यात असे प्रकार घडू नयेत याकरिता महानगरपालिका व पोलिसांनी संयुक्त पथके नेमावीत.
- जटपुरा गेट परिसरात CCTV वॉच टॉवर व CCTV कॅमेरे बसवावेत.
चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक तसेच महानगरपालिका आयुक्त यांना याबाबत टॅग करून अनेक नागरिकांनी कारवाई अपेक्षित असल्याचे म्हटले आहे.
चंद्रपूरकरांचा संदेश स्पष्ट आहे –
“संतांचा आदर करायचा असेल तर त्यांचे विचार जगावेत, ऐतिहासिक वास्तूंच्या भिंतीवर नव्हे!”

