आदिवासी समाज आक्रमक; पोंभुर्णा-गोंडपिपरी मार्ग रोखला
पोंभुर्णा:- प्रशासनाने लेखी आश्वासन देऊनही मागण्या पूर्ण न केल्यामुळे पोंभूर्णा येथे आदिवासी समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पेसा ग्राम आणि वनजमिनीच्या पट्ट्यांच्या मागणीसाठी पोंभूर्णा-गोंडपिपरी मार्ग पूर्णपणे अडवून ठेवण्यात आला आहे.
हि परिस्थिती अचानक उद्भवलेली नाही. गोंडवाना आंदोलन आदिवासी चळवळीचे नेते जगन येलके यांनी यापूर्वीही तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. आमदार मुनगंटीवार यांच्या मध्यस्थीने ७ नोव्हेंबर रोजी प्रशासनाने मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले, त्यानंतर आंदोलनाची सांगता झाली होती. मात्र, प्रशासनाने हे लेखी आश्वासन पाळले नाही आणि मागण्या तशाच राहिल्या.
प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे संतप्त झालेल्या जगन येलके यांनी २७ नोव्हेंबरपासून अन्नत्याग उपोषण सुरु केले. प्रशासनाकडून कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे आदिवासी समाजाने आता थेट रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन पुकारले आहे.
पोंभूर्णा-गोंडपिपरी मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जोपर्यंत पेसा ग्राम आणि वनजमिनीच्या पट्ट्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका आदिवासी समाजाने घेतली आहे.

