चंद्रपूर:- अवघ्या चार वर्षांच्या वयात राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत अधीर अमृता सुबोध जुन्नावार याने चंद्रपूर शहराचे नाव देशपातळीवर उंचावले आहे. त्याने नुकत्याच पार पडलेल्या अचिव्हर्स ऑलिम्पियाड या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळविले आहे.
अधीर सध्या माउंट कार्मेल कॉन्वेंट स्कूल, चंद्रपूर येथे नर्सरी वर्गात शिक्षण घेत आहे. विशेष बाब म्हणजे, इतक्या लहान वयात राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारा तो पहिला विद्यार्थी ठरला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल माउंट कार्मेल कॉन्वेंट शाळेत आयोजित कार्यक्रमात अधीरचा मेडल, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान थॉमस चर्च तुकूमचे फादर बिपीन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापिका सिस्टर कॅथरीन, वर्ग शिक्षिका मीनाक्षी, शाळेतील शिक्षकवर्ग, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. अधीरच्या या यशामागे त्याची जिद्द, सातत्यपूर्ण सराव तसेच कोच सोनी जसपाल यांचे योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. स्पर्धेचे आयोजन इनलाईन स्केटिंग प्रकारांतर्गत राष्ट्रीय पातळीवर ऑन लाईन पद्धतीने करण्यात आले होते. अधीरच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यात तो आणखी मोठी कामगिरी करेल, असा विश्वास त्याच्या पालकांनी आणि प्रशिक्षकांनी व्यक्त केला आहे.


