चंद्रपूर:- निवडणुकीचा रणसंग्राम शिगेला पोहोचला आहे, मात्र चंद्रपूरच्या राजकारणात सध्या एकच चर्चा आहे... यादी कधी जाहीर होणार? उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्याचा शेवटचा दिवस शिल्लक असतानाही, ना भाजपने आपली पूर्ण पत्ती उघडली आहे, ना काँग्रेसने! दोन्ही मोठ्या पक्षांनी अद्यापही उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर न केल्याने चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
उद्या फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, पण तिकीट कोणाला मिळणार? हेच अजून स्पष्ट नाही. यामुळे इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. 'आता उमेदवारी मिळणार की नाही? आणि मिळाली तरी तयारीसाठी वेळ किती उरणार?' असे प्रश्न कार्यकर्त्यांना सतावत आहेत.
पण भाजप आणि काँग्रेस यादी जाहीर करायला इतका उशीर का करत आहेत? याचं मुख्य कारण म्हणजे 'बंडखोरी'. जर यादी आधी जाहीर केली, तर डावललेले उमेदवार बंडखोरी करून दुसऱ्या पक्षात जाण्याची किंवा अपक्ष उभे राहण्याची दाट शक्यता आहे. हीच बंडखोरी रोखण्यासाठी दोन्ही पक्षांनी सध्या 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली असून, अगदी शेवटच्या क्षणी नावे जाहीर करण्याचे धोरण आखल्याचे दिसत आहे.
आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या उद्याच्या दिवसाकडे. शेवटच्या दिवशी एबी फॉर्म (AB Form) कोणाला मिळतात आणि कोणाचे पत्ते कट होतात, यावरच अनेक मतदारसंघांचे भवितव्य ठरणार आहे. उमेदवारांची धावपळ आता गल्लीपासून नागपूरपर्यंत वाढली आहे.

