गडचिरोली:- मुलचेरा येथील एका कंत्राटी महिला आरोग्य सेविका (C-ANM) यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री (वय- 50) यांच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दि. 6 डिसेंबर, 2025 रोजी त्यांनी राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे आंतर रुग्ण (In-patient) म्हणून भरती करण्यात आले होते.
प्राप्त माहितीनुसार, डॉ. विनोद म्हशाखेत्री हे मागील दोन वर्षांपासून सदर कंत्राटी महिला आरोग्य सेविकेला वेतनामध्ये वाढ करून देतो, या आमिषाने वारंवार शारीरिक सुखाची मागणी करत होते व त्यांना मानसिक त्रास देत होते. या जाचाला कंटाळून संबंधित आरोग्य सेविकेने हे टोकाचे पाऊल उचलले.
या गंभीर घटनेनंतर, आज दिनांक 08/12/2025 रोजी पोलीस स्टेशन, गडचिरोली येथे डॉ. म्हशाखेत्री यांच्या विरोधात 'Zero FIR' दाखल करण्यात आली आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 75(2), 78(2) अन्वये त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सध्या सदर कंत्राटी महिला आरोग्य सेविका यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. गुन्हा Zero FIR म्हणून गडचिरोली येथे दाखल करण्यात आला असला तरी, पुढील तपास पोलीस स्टेशन मुलचेरा येथील पोलीस अधिकारी करत आहेत. या घटनेमुळे आरोग्य विभागात आणि गडचिरोली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

