पोंभुर्णा:- चंद्रपूर जिल्ह्याच्या पोंभुर्णा तालुक्यात अतिवृष्टी अनुदानामध्ये झालेल्या कथित घोटाळ्यावरून आता राजकारण तापू लागले आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी काँग्रेस युवा नेते वैभव पिंपळशेंडे यांनी थेट भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.
पोंभुर्णा तालुक्यात पीकहानी आणि अतिवृष्टी अनुदानाच्या वाटपात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस युवा नेते वैभव पिंपळशेंडे यांनी केला आहे. पिंपळशेंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन या घोटाळ्याचे पुरावे सादर केल्याचा दावा केला आहे.
आरोप काय आहेत?
शासनाने ठरवलेल्या पीकहानीच्या निकषांची पायमल्ली करण्यात आली. शेती नसलेल्या आणि तालुक्याबाहेरील व्यक्तींच्या नावावर बनावट सातबारे तयार करून त्यांना शेतकरी घोषित करण्यात आले. या बोगस लाभार्थ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळवून देण्यात आले. अनुदान मिळाल्यानंतर ही रक्कम काही खास मंडळी आणि एजंट्समध्ये वाटण्यात आल्याचाही त्यांचा आरोप आहे.
या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन, पिंपळशेंडे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि स्थानिक आमदार सुधीर मुनगंटीवार यांना साकडे घातले आहे. उच्चस्तरीय आणि स्वतंत्र चौकशी करण्याची, तसेच या गैरव्यवहारात सहभागी असलेल्या अधिकारी-कर्मचारी आणि अन्य व्यक्तींवर कठोर शिस्तभंग कारवाईसह गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या मागणीमुळे पोंभुर्णा तालुक्यातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आमदार मुनगंटीवार यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घोटाळ्याची चौकशी होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

