वरोरा:- वरोरा तालुक्यातील बामर्डा-माढेळी या महत्त्वाच्या मार्गावर. आणि हा रस्ता आता फक्त मार्ग राहिला नसून, तो अपघातांचा धोका बनला आहे. याचे मुख्य कारण आहे, परिसरातील रेतीघाटावर सुरू असलेला अनियंत्रित रेतीउपसा!
बामर्डा परिसरातील रेतीघाटावरून वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या जड वाहनांच्या सततच्या हालचालीमुळे हा मुख्य रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. रस्त्यावर मोठमोठे, जीवघेणे खड्डे पडले आहेत. सर्वत्र धूळ आणि उकरलेला भाग यामुळे साधे चालणे देखील धोकादायक झाले आहे.
विशेष म्हणजे, इतकी गंभीर परिस्थिती असूनही आजपर्यंत या प्रकरणात प्रशासनाकडे कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. याचा फायदा घेत रेतीघाटावरील हालचाल कोणतीही बंधने न ठेवता सुरू आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण आहे.
बामर्डा–माढेळी हा परिसरातील एक अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. रस्त्याची झालेली दैना, झालेले अपघात आणि स्थानिकांचा वाढता आक्रोश पाहता, तात्काळ पाहणी आणि रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होणे आवश्यक आहे. त्यासोबतच, अवैध रेतीउपशावर कडक नियंत्रण आणण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. स्थानिकांचा जीव वाचवण्यासाठी, प्रशासनाने तातडीने कठोर पाऊले उचलणे अपेक्षित आहे.

