Tiger Attack: चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा वाघहल्ल्याची भीषण घटना समोर आली आहे. चिमूर तालुक्यातील शंकरपूरजवळील कवडशी परिसरात सोमवारी रात्री एका शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे मंगळवारी उघड झाले. मृत शेतकऱ्याचे नाव शेषराव  झाडे(वय ५२, रा. कवडशी) असे असून ही घटना समजताच परिसरात मोठी खळबळ उडाली.


सोमवारी सायंकाळी शेषराव झाडे हे शंकरपूर येथे बाजार हाट करण्यासाठी गेले होते. रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. त्यांच्या शोधासाठी गावकऱ्यांनी रात्रभर प्रयत्न केले; मात्र त्यांचा काहीच मागमूस लागला नव्हता.


मंगळवारी सायंकाळी शंकरपूर-कवडशी रस्त्यालगत एमएसईबी कार्यालयाजवळ त्यांचा मृतदेह आढळला. मृतदेहाचा वरचा भाग वाघाने खाल्लेल्या अवस्थेत असल्याचे आढळल्याने हा वाघाचा हल्ला असल्याची खात्री पटली. कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी ताबडतोब ही माहिती वनविभाग आणि पोलिसांना दिली.


वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. प्राथमिक तपासातून मृत्यू वाघाच्या हल्ल्यामुळे झाल्याची पुष्टी मिळाली आहे. ही घटना समोर आल्यानंतर ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.