चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिकेच्या सत्तासंघर्षात आता एक मोठे वळण आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येत थेट प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे आणि वंचितचे शहराध्यक्ष स्नेहल रामटेके यांनी वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. ही केवळ सदिच्छा भेट नसून, ही एक मोठी राजकीय चाल असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, या भेटीला शिवसेनेचे ६ नगरसेवक, वंचितचे २ आणि २ अपक्ष नगरसेवक असे एकूण १० जण उपस्थित होते.
चंद्रपूर महापालिकेत सध्या कोणालाही स्पष्ट बहुमत नसल्याने सत्तेचा पेच निर्माण झाला आहे. अशातच 'जो पक्ष आमचा महापौर करणार, आम्ही त्यांच्यासोबत राहू' असे सूचक विधान संदीप गिऱ्हे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. आता प्रत्यक्ष प्रकाश आंबेडकरांच्या भेटीने शिवसेनेने महापौरपदासाठी आपली प्रबळ इच्छा दर्शवली असून, काँग्रेस आणि भाजप या दोन्ही मोठ्या पक्षांची डोकेदुखी वाढली आहे.
सध्याच्या परिस्थितीत शिवसेनेचे नगरसेवक आणि वंचितची साथ मिळाल्याशिवाय कोणालाही बहुमताचा आकडा गाठणे कठीण झाले आहे. या भेटीनंतर चंद्रपूरच्या राजकारणात 'किंगमेकर' कोण ठरणार? आणि शिवसेनेचा महापौर होणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत अनेक गुप्त विषयांवर चर्चा झाली असून लवकरच चंद्रपूरच्या सत्तेचे नवे समीकरण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे चंद्रपूरच्या राजकारणात आता मोठ्या हालचालींना वेग आला आहे.

