Chandrapur News: मुरसा ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार

Bhairav Diwase
मिलियन स्टील कंपनीला दिलेली 'एनओसी' रद्द करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक!
भद्रावती:- तालुक्यातील मुरसा ग्रामपंचायतीने 'मिलियन स्टील लिमिटेड' कंपनीला दिलेली ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ग्रामसभेचा विरोध डावलून आणि गावकऱ्यांना अंधारात ठेवून पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.


नेमके प्रकरण काय?

मुरसा ग्रामपंचायतीने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी मिलियन स्टील कंपनीला कारखाना उभारणीसाठी एनओसी दिली होती. मात्र, ही प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा आरोप करत १८ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या अधिकृत ग्रामसभेत सर्व गावकऱ्यांनी ही एनओसी एकमताने नामंजूर केली होती. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी एनओसी रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ३० डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या मासिक सभेत पुन्हा कंपनीला एनओसी देऊन ग्रामसभेच्या निर्णयाला हरताळ फासल्याचे समोर आले आहे.


ग्रामस्थांचे प्रमुख आक्षेप:
१. रोजगाराची हमी नाही: सुशिक्षित आणि अल्पशिक्षित तरुणांना कायमस्वरूपी रोजगार आणि वेतनश्रेणीबाबत कंपनीने कोणतेही लेखी आश्वासन दिलेले नाही.
२. पर्यावरणाचा धोका: कंपनीमुळे होणारे जल, वायू आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी कोणताही 'पर्यावरण व्यवस्थापन आराखडा' सादर केलेला नाही.
३. चुकीची माहिती सादर करणे: मासिक सभेला 'ग्रामसभा' म्हणून दाखवून जिल्हा प्रशासनाची दिशाभूल केल्याचा खळबळजनक आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
४. जनसुनावणीची लपवाछपवी: कंपनीने आयोजित केलेल्या जनसुनावणीची (Public Hearing) माहिती ग्रामपंचायतीने जाणीवपूर्वक गावकऱ्यांपासून लपवून ठेवली आणि गावात नोटीसही लावली नाही.

या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि कंपनीला दिलेली बेकायदेशीर एनओसी तात्काळ रद्द करावी, अशी मागणी मुरसा ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे केली आहे.