Chandrapur Railway Station: चंद्रपूर रेल्वे स्थानकावर थरार: 'नवजीवन एक्स्प्रेस'मध्ये चढताना वृद्धाचा पाय घसरला!

Bhairav Diwase

स्टेशन मॅनेजर आणि प्रवाशांच्या धाडसामुळे प्रवाशाला जीवदान!


चंद्रपूर:- आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास चंद्रपूर रेल्वे स्थानकावर एक हृदयद्रावक पण तितकीच थरारक घटना घडली. अहमदाबादहून चेन्नईकडे जाणाऱ्या गाडी क्रमांक १२६५५ नवजीवन एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना एका वृद्ध प्रवाशाचा पाय अचानक घसरला. मात्र, रेल्वे स्टेशन मॅनेजर आणि उपस्थित प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे या ६५ ते ७० वर्षीय वृद्धाचे प्राण थोडक्यात वाचले आहेत.


नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, नवजीवन एक्स्प्रेस चंद्रपूर स्थानकावरून सुटत असताना एका ६५-७० वर्षीय प्रवाशाने चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्यांचा तोल गेला आणि पाय घसरून ते प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या दरम्यान असलेल्या गॅपमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली होती.

अयाज खान आणि प्रवासी यांनी दाखवले धाडस:

ही घटना प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेले चंद्रपूर रेल्वे स्थानकाचे स्टेशन मॅनेजर अयाज खान यांच्या लक्षात येताच त्यांनी कसलाही विचार न करता प्रवाशाच्या दिशेने धाव घेतली. खान आणि तिथे असलेल्या इतर प्रवाशांनी तत्परतेने त्या वृद्धाला ओढून सुरक्षितपणे प्लॅटफॉर्मवर खेचले. काही सेकंदाचा जरी उशीर झाला असता, तर मोठा अनर्थ घडला असता. त्यानंतर गाडी थांबवून पुन्हा त्या वृद्धाला सुखरूप पणे त्या गाडीमध्ये बसवण्यात आले. स्टेशन मॅनेजर अयाज खान आणि सतर्क प्रवाशांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.