Gadchandur News : नगरपरिषद गडचांदूर : विषय समिती निवडणूक वादाच्या भोवऱ्यात

Bhairav Diwase
'त्या' बेकायदेशीर ठरावाविरुद्ध भाजप आक्रमक

चंद्रपूर:- गडचांदूर नगरपरिषदेच्या विषय समिती निवडीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. २० जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या विशेष सभेत पीठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी आशिष चव्हाण यांनी सत्ताधारी पक्षाला अनुकूल भूमिका घेत पक्षपात केल्याचा खळबळजनक आरोप भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी केला आहे. या प्रक्रियेत नियमांची पायमल्ली करून दिशाभूल करणारे इतिवृत्त लिहिल्याचा दावा करत भाजपच्या ८ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.


नेमका वाद काय?

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी, विषय समिती निवडीच्या सभेत समित्यांची संख्या आणि सदस्य संख्या यावरून पेच निर्माण झाला. सभेच्या सुरुवातीला पाच समित्यांचे गठन करण्यात आले. पीठासीन अधिकाऱ्यांनी एका समितीमध्ये ३ ते ५ सदस्य असावेत असे सुचवले होते. मात्र, नगराध्यक्षांच्या मागणीनुसार '४ सदस्य' असावा असा ठराव ८ विरुद्ध १२ मतांनी मंजूर करण्यात आला.
गोंधळ तेव्हा झाला जेव्हा सत्ताधारी पक्षाच्या लक्षात आले की ४ सदस्यांच्या नियमामुळे त्यांच्या मित्रपक्षाचा एक सदस्य कमी होत आहे. यावर त्यांनी पुन्हा ठराव बदलण्याची मागणी केली. विरोधी पक्षाने (भाजप) याला तीव्र विरोध केला, कारण एकदा बहुमताने मंजूर झालेला ठराव त्याच सभेत बदलणे नियमबाह्य आहे. मात्र, पीठासीन अधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांची बाजू सावरत फेरविचाराची भूमिका घेतल्याने भाजप नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकून सभागृहाच्या दारावर ठिय्या आंदोलन सुरू केले.


मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?

विरोधी पक्षाच्या अनुपस्थितीत पीठासीन अधिकाऱ्यांनी एकतर्फी कामकाज सुरू ठेवून विषय समित्यांची निवड जाहीर केली. यामध्ये महिला व बालकल्याण समिती अनिवार्य असूनही तिला अनुमोदन न मिळणे, हा महिला सदस्यांवरील अन्याय असल्याची भावना व्यक्त होत आहे.


१४ तास ताटकळत ठेवले!

सर्वात गंभीर बाब म्हणजे, सभेचे इतिवृत्त आणि व्हिडिओ चित्रीकरण मागण्यासाठी भाजप नगरसेवक तब्बल १४ तास नगर परिषद कार्यालयात बसून होते. रात्री १ वाजता मिळालेल्या चित्रफितीमध्ये आणि लिखित इतिवृत्तात मोठी तफावत दिसून येत असून, मुख्याधिकाऱ्यांनी प्रशासनाची आणि शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप भाजपचे गटनेते सतिश बेतावार यांनी केला आहे.


याप्रकरणी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि ही नियमबाह्य निवडणूक रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला भाजपा नेते अरविंद डोहे, नगरसेवक सतिश उपलेंचवार, नगरसेवक सुरज पांडे, नगरसेविका सपना सेलोकर, नगरसेविका शितल धोटे, नगरसेविका किर्ती वैरागडे आदी उपस्थित होते.