CET Exam Chandrapur: चंद्रपुरात बीएड सीईटी परीक्षेचा बोजवारा

Bhairav Diwase
सर्व्हर डाउनमुळे विध्यार्थ्यांचा परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ
चंद्रपूर:- बीएड सीईटी परीक्षेदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांचा मोठा खोळंबा झाला असून, डॉ. आंबेडकर ऑनलाइन परीक्षा केंद्राबाहेर प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका शेकडो विद्यार्थ्यांना बसला असून त्यांचे शैक्षणिक भविष्य आता टांगणीला लागले आहे.

आज नियोजित असलेल्या बीएड सीईटी परीक्षेसाठी विद्यार्थी सकाळी १० वाजेपासून केंद्रावर हजर होते. त्यानंतर केंद्रात प्रवेश देण्यात आला. परीक्षेला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच 'सर्व्हर डाउन' झाल्याने सर्व संगणक प्रणाली ठप्प झाली.


आम्ही एक प्रश्न सोडवला आणि अचानक स्क्रीन बंद झाली. कोणीही नीट उत्तर द्यायला तयार नाही. आमच्या करिअरचं काय? असा संतप्त सवाल विद्यार्थी उपस्थित केला.


परिक्षा सुरू होताच संगणक बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. संतापलेल्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ केला. सीईटी सेलच्या या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप केला जात असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे.