Chandrapur News: चंद्रपुरातील डॉ. आंबेडकर महाविद्यालयात बी.एड. CET परीक्षेदरम्यान तांत्रिक बिघाड

Bhairav Diwase

सिनेट सदस्य निलेश बेलखेडेंचा तातडीचा हस्तक्षेप; CET सेलशी चर्चा करून तांत्रिक अडथळे दूर
चंद्रपूर:- संपूर्ण महाराष्ट्रात आज २७ मार्च रोजी बी.एड. (B.Ed. CET) प्रवेश परीक्षा विविध केंद्रांवर पार पडल्या. मात्र, चंद्रपूर येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालय केंद्रावर सकाळी ११ वाजेच्या सत्रात सर्व्हर डाऊन झाल्याने प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. पेपर सोडवत असतानाच अचानक संगणक लॉगआऊट झाले, तर काहींचे आयडी-पासवर्ड सिस्टिम स्वीकारत नव्हते. यामुळे सुमारे दोन तास परीक्षा प्रक्रिया ठप्प झाली होती.

या केंद्रावर केवळ चंद्रपूरच नव्हे, तर इतर जिल्ह्यांतूनही विद्यार्थी आले होते. तांत्रिक बिघाडामुळे आपले शैक्षणिक वर्ष वाया जाईल की काय, या भीतीने विद्यार्थ्यांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. केंद्र प्रमुख आणि बाह्य परीक्षकांनाही नेमकी काय उत्तरे द्यावी हे सुचत नसल्याने परिस्थिती हाताबाहेर जात होती.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन काही विद्यार्थ्यांनी तातडीने गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा भाजप युवा नेते प्रा. निलेश बेलखेडे यांच्याशी संपर्क साधला. बेलखेडे यांनी तात्काळ सूत्रे हलवत नागपूर जॉईंट डायरेक्टर ( JD) कार्यालयाचे अधिकारी खोब्रागडे यांच्याकडून संपर्क क्रमांक मिळवले. त्यानंतर मुख्य CET सेल कार्यालयातील अधिकारी पुष्पक जैन यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

सुरुवातीला परीक्षा २-३ दिवसांसाठी पुढे ढकलण्याचा (Reschedule) प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी बेलखेडे यांनी 'आजच परीक्षा व्हावी' असा आग्रह धरला. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला आणि काही वेळातच परीक्षा पुन्हा सुरळीत सुरू झाली.


केवळ तांत्रिक अडथळाच नव्हे, तर केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याचे निदर्शनास येताच बेलखेडे यांनी केंद्र प्रमुखांशी बोलून विद्यार्थ्यांसाठी तात्काळ पाण्याची सोय उपलब्ध करून दिली. प्रा. निलेश बेलखेडे यांच्या समयसूचकतेमुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले असून, विद्यार्थ्यांनी त्यांचे आणि केंद्र कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

परजिल्ह्यातील विद्यार्थी आर्थिक ओढाताण करून परीक्षेला येतात. अशा वेळी तांत्रिक कारणास्तव त्यांचे नुकसान होऊ नये, हाच आमचा प्रयत्न होता. CET सेलने आमची मागणी मान्य केल्यामुळे विद्यार्थ्यांचा नुकसान टळले आहे.
प्रा. निलेश बेलखेडे (सिनेट सदस्य, गोंडवाना विद्यापीठ)