चंद्रपूर:- राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं असून, काँग्रेस नेते आणि विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर अत्यंत विखारी शब्दांत टीका केली आहे. "जर मला ताकद मिळाली, तर २०२९ मध्ये राज्यात भाजपची सत्ता उलथवून काँग्रेसची सत्ता आणल्याशिवाय राहणार नाही," अशी गर्जना वडेट्टीवार यांनी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
चिमूरच्या या मेळाव्यात विजय वडेट्टीवार यांनी भाजपच्या धोरणांवर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार प्रहार केला. भाजप हा केवळ ३ टक्के लोकांचा आणि व्यापाऱ्यांचा पक्ष असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. विशेष म्हणजे, ऐतिहासिक संदर्भ देत त्यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला.
हे लोक इंग्रजांचे मुनीम होते, दिवाणजी होते. त्यामुळेच त्यांचे वाडे आजही टिकून आहेत. गडकरी वाडा, फडणवीस वाडा, बापट वाडा असो की भांगडिया वाडा... हे सर्व वाडे आजही उभे आहेत. पण मग बहुजनांचे वाडे आज कुठे आहेत? ते का दिसत नाहीत? वडेट्टीवार यांनी केवळ टीकाच केली नाही, तर २०२९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच शड्डू ठोकला आहे. राज्यात काँग्रेसची सत्ता परत मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी संघटित व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. भाजपच्या 'वाडा संस्कृती'वर त्यांनी केलेलं हे भाष्य आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

