Murder News: पोटच्या लेकीनेच पाजलं पित्याला 'विषाचं' मिल्कशेक

Bhairav Diwase
चंद्रपूरमधील पोलीस पित्याच्या हत्येचा ३ वर्षांनंतर उलगडा!
चंद्रपूर:- बापाच्या हत्येचा कट या लेकीने रचला. तब्बल तीन वर्षांनंतर या गुन्ह्याचं गूढ उकललं असून, स्वतःच्या पतीच्या एका कबुलीने या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. ही घटना आहे २५ एप्रिल २०२३ ची. चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय भवनात ड्युटीवर असताना पोलीस कर्मचारी जयंत बाल्लावार यांचा अचानक मृत्यू झाला. तेव्हा तो नैसर्गिक मृत्यू असल्याचं मानलं गेलं. पण वास्तव काही वेगळंच होतं. जयंत बाल्लावार यांची मुलगी आर्या हिचे आशिष शेडमाकेसोबत प्रेमसंबंध होते. वडिलांचा या प्रेमाला विरोध असल्याने आर्याने टोकाचे पाऊल उचलले.

घटनेच्या दिवशी आर्याने आपल्या पित्याला प्रेमाने 'मिल्कशेक' प्यायला दिले. पण त्यात प्रेम नाही, तर विष होतं. ड्युटीवर गेल्यावर काही वेळातच बाल्लावार यांचा मृत्यू झाला. या कामात तिला तिचा मावसभाऊ चैतन्य गेडाम याने मदत केली, ज्याने ५ हजार रुपयांत विष आणून दिलं होतं.


वडिलांच्या मृत्यूनंतर आर्या आणि आशिषने लग्न केलं. मात्र, नियतीला काही वेगळंच मान्य होतं. आशिषला शिस्तभंगाच्या कारवाईमुळे पोलीसमधून बडतर्फ करण्यात आलं. दुसरीकडे आर्याने सासरी येण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाले. संतापलेल्या आशिषने अखेर रामनगर पोलीस गाठले आणि या क्रूर हत्येचा पाढा वाचला.


रामनगर पोलिसांनी आता महिला पोलीस अंमलदार आर्या बाल्लावार, तिचा पती आशिष शेडमाके, मावसभाऊ चैतन्य आणि विष पुरवणारा अशा चौघांना अटक केली आहे. ज्या खाकीवर जनतेचा विश्वास असतो, त्याच खाकीतल्या व्यक्तीने केलेल्या या कृत्याने संपूर्ण पोलीस दलात खळबळ माजली आहे.