Chandrapur News : बापाच्या मायेला लेकीने दिला विषाचा घास; 'अकस्मात मृत्यू' निघाला 'सुनियोजित मर्डर'.

Bhairav Diwase

चंद्रपूर:- प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्या पित्याचा काटा काढण्यासाठी एका महिला पोलीस शिपायाने आपल्या पोलीस प्रियकराच्या मदतीने जन्मदात्यालाच विष देऊन ठार केल्याची खळबळजनक घटना चंद्रपुरात उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे अपघाती मृत्यू वाटणारी ही घटना तब्बल 3 वर्षांनंतर तपासात समोर आली आहे. याप्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह चौघांना अटक करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, जयंत अशोकराव बाल्लावार यांची २२ वर्षीय मुलगी आर्या बाल्लावार ही चंद्रपूर पोलीस दलात कार्यरत आहे. तिचे २०१२ पासून पोलीस शिपाई आशिष महेश शेडमाके (३०) याच्याशी प्रेमसंबंध होते. तो चंद्रपुरातील भद्रावतीमधील जुना सुमठाणा या ठिकाणी राहत होता. मात्र त्यांच्या या नात्याला जयंत बाल्लावार यांचा तीव्र विरोध होता. या मुद्द्यावरून घरात वारंवार कडाक्याची भांडणे होत असत. वडिलांच्या या विरोधामुळे त्रस्त झालेल्या आर्या आणि आशिषने त्यांना कायमचे संपवण्याचा क्रूर कट रचला.

यानंतर आपल्याच विभागातील खाकी वर्दीचा गैरफायदा घेत आशिष शेडमाके याने हत्येची योजना आखली. त्याने आपल्या एका विधी संघर्षग्रस्त मावसभावाच्या माध्यमातून चैतन्य ऊर्फ मोंटी सचिन गेडाम (२२, रा. नवीन सुमठाणा, भद्रावती) याच्याकडून ५,००० रुपयांत विषाची एक बाटली विकत घेतली. हे विष देऊन जयंत बाल्लावार यांचा मृत्यू नैसर्गिक वाटावा, अशी त्यांची योजना होती.

यानंतर २४ मार्च २०२३ रोजी आशिषने विषाची बाटली आर्याच्या स्वाधीन केली. दुसऱ्या दिवशी २५ मार्च रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास आर्याने घरात पित्याप्रती प्रेमाचे नाटक करत वडिलांना मिल्कशेक प्यायला दिला. या मिल्कशेक मध्ये तिने आधीच विष मिसळले होते. वडिलांनी लेकीवर विश्वास ठेवून ते तो मिल्कशेक प्यायले. त्यानंतर ते आपल्या कर्तव्यावर निघून गेले.

विष प्राशन केल्यामुळे जयंत बाल्लावार यांना कर्तव्यावर असतानाच अचानक चक्कर आली आणि ते कोसळले. त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यावेळी ही घटना आकस्मिक मृत्यू म्हणून नोंदवण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आणि तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने तपास केला असता, ही आकस्मिक घटना नसून सुनियोजित हत्या असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी आशिष महेश शेडमाके (३०, रा. जुना सुमठाणा, भद्रावती), कॉन्स्टेबल मुलगी आर्या जयंत बाल्लावार (२२, रा. चंद्रपूर), चैतन्य ऊर्फ मोंटी सचिन गेडाम (२२, रा. नवीन सुमठाणा, भद्रावती) आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.