चंद्रपूर:- वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत बामर्डा रेती घाट वादातून झालेल्या भारत नागपाल हत्या प्रकरणातील गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या १३ व्या आरोपीला अटक करण्यात चंद्रपूर पोलिसांना यश आले आहे. जुम्मन मिडवा मिर्झा (२४, रा. उत्तर प्रदेश) असे या आरोपीचे नाव असून, त्याला उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे.
दिनांक १ मार्च २०२६ रोजी बामर्डा रेती घाटाच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली होती. या वादात वर्धा येथील रेती व्यावसायिक भारत नागपाल यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये (गुन्हा क्र. ३७४/२०२६) गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात एकूण १३ आरोपी निष्पन्न झाले होते, ज्यापैकी १२ जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती.
सदर आरोपी हे संघटितरीत्या गुन्हेगारी कृत्य करत असल्याचे निष्पन्न झाल्याने, या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत सुरू करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
आरोपी जुम्मन मिर्झा हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे, हा आरोपी उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात लपून असल्याची माहिती मिळाली. स.पो.नि. दीपक काकडेवार आणि त्यांच्या पथकाने उत्तर प्रदेशात जाऊन अत्यंत शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले.
आज, २६ मार्च २०२६ रोजी आरोपीला वरोरा येथे आणून विशेष मकोका न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीला ३१ मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले, स.पो.नि. दीपक काकडेवार आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली.

