​Chandrapur News: पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनावर पोलिसांचा 'सर्जिकल स्ट्राईक'; इको-प्रो आक्रमक

Bhairav Diwase

चंद्रपूर:- जिल्ह्यातील वाढता मानव-वन्यजीव संघर्ष आणि ताडोबाच्या महत्त्वपूर्ण व्याघ्र कॉरिडॉरला धोका निर्माण करणाऱ्या 'लोहारडोंगरी' खाण प्रकल्पाविरोधात पुकारलेले आंदोलन आता एका वेगळ्या वळणावर आले आहे. इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाचा पाचवा दिवस होता. मात्र, मध्यरात्री पोलिसांनी आंदोलनस्थळी धाव घेत धोतरे यांना ताब्यात घेतले आणि जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केले.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंडू धोतरे मागील पाच दिवसांपासून अन्नत्याग करत आहेत. या पाच दिवसांत त्यांची प्रकृती खालावल्याचे सांगत पोलिसांनी त्यांना मध्यरात्री उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, इको-प्रोच्या कार्यकर्त्यांनी आणि स्वतः धोतरे यांनी या कारवाईला तीव्र विरोध केला. "माझी प्रकृती स्थिर असताना केवळ आंदोलन दडपण्यासाठी ही पोलीस बळाचा वापर करत आहेत," असा थेट आरोप बंडू धोतरे यांनी केला आहे.


लोहारडोंगरी प्रकल्पामुळे ताडोबा आणि अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या नैसर्गिक कॉरिडॉरला मोठा धोका निर्माण झाला आहे. या प्रकल्पामुळे वाघांचा नैसर्गिक वावर बाधित होऊन मानव-वन्यजीव संघर्षात आणखी वाढ होईल, अशी भीती पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याच मागणीसाठी धोतरे यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १६ मागण्यांसह हे आंदोलन सुरू


पोलिसांनी केलेल्या या मध्यरात्रीच्या कारवाईमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आता हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बंडू धोतरे यांना रुग्णालयातून सोडले जाते की हे आंदोलन अशाच प्रकारे दडपले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.