SP कॉलेजच्या ५ विद्यार्थ्यांची 'लॉईड्स स्टील'मध्ये निवड!
चंद्रपूर:- स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयाने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली असून, येथील पदव्युत्तर रसायनशास्त्र विभागाच्या पाच विद्यार्थ्यांची नामांकित 'लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड, घुग्गुस' येथे 'केमिस्ट' या पदावर निवड झाली आहे.
लॉईड मेटल्सच्या 'ग्रॅज्युएट ट्रेनी' निवड प्रक्रियेअंतर्गत या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, अद्याप पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच या विद्यार्थ्यांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या यशात प्राध्यापिका आकांक्षा बॉमकंठीवार आणि अर्चना रॉय यांचे मोलाचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले. कौस्तुभ राजेश खंडाईत, महेक फातिमा शेख, खुशी सुभाष बोकारे, मन्नतून अनिस शेख, भार्गवी विठ्ठल मस्की या विद्यार्थ्यांची निवड झालेले आहेत.
मानव संसाधन विभागाच्या टॅलेंट अक्विझेशन टीमने या विद्यार्थ्यांची निवड केली आहे. कंपनीच्या नियमांनुसार या विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था, वाहतूक, वैद्यकीय सुविधा आणि उपहारगृहाची सुविधा पुरवली जाणार आहे. पदव्युत्तर अंतिम वर्षाची परीक्षा झाल्यानंतर हे सर्व विद्यार्थी प्रत्यक्ष कामावर रुजू होतील.
या घवघवीत यशाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष किशोर जोरगेवार, सचिव प्रशांत पोटदुखे, प्राचार्य डॉ. पी.एम. काटकर आणि रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे. या यशामुळे संपूर्ण महाविद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

