गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी सोमय्या ग्रुप सज्ज!
चंद्रपूर:- जगभरात सध्या युद्धजन्य परिस्थिती, महागाई आणि राजकीय अस्थिरतेचे सावट असताना, "युद्ध नव्हे, तर शांती हवी" असा वैश्विक संदेश देण्यासाठी चंद्रपूरातील सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स सज्ज झाला आहे. येत्या शनिवार, २८ मार्च २०२६ रोजी वडगाव येथील सोमय्या कॅम्पसमध्ये हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत जगातील सर्वात मोठे मानवी 'जागतिक शांतता चिन्ह' (International Peace Symbol) साकारले जाणार आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार:
या अभूतपूर्व उपक्रमाची नोंद थेट 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये करण्यासाठी संस्थेने कंबर कसली आहे. विशेष म्हणजे, हा कार्यक्रम जगातील सुमारे १८० देशांमध्ये प्रसारित केला जाणार असून, चंद्रपूरचे नाव जागतिक नकाशावर झळकणार आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढता तणाव आणि संभाव्य तिसऱ्या महायुद्धाच्या भीतीने जग ग्रासलेले असताना, चंद्रपूरचे विद्यार्थी शांततेसाठी एकत्र येणार आहेत.
एकाच महिन्यात दुसरा विश्वविक्रम!
सोमय्या ग्रुपने यापूर्वीच आपल्या शिस्तीचा आणि नियोजनाचा परिचय दिला आहे. १ मार्च २०२६ रोजी सोमय्या संस्था व उत्कृष्ट महिला मंच यांनी २७०० महिला व विद्यार्थिनींच्या सहभागातून अवघ्या ७ मिनिटांत २० लावण्यांचे सादरीकरण करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. आता एका महिन्याच्या आतच दुसरा विश्वविक्रम प्रस्थापित करण्याच्या उंबरठ्यावर ही संस्था उभी आहे.
"हा उपक्रम केवळ एक विक्रम नसून, ती मानवतेची एकता आणि सहअस्तित्वाची हाक आहे. चंद्रपुरातून जाणारा हा शांततेचा संदेश संपूर्ण जगाला प्रेरणा देईल."
श्री. पी. एस. आंबटकर (अध्यक्ष, सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स)

