चंद्रपूर:- स्वत:ला युट्यूब चॅनल आणि साप्ताहिक वृत्तपत्राचे प्रतिनिधी असल्याचे सांगून एका व्यवसायिकाला धमकावत खंडणी मागणाऱ्या पाच जणांविरुद्ध चिमूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ माजली असून, तोतया पत्रकारांच्या कृत्याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, वडाळा पैकु येथील रहिवासी आणि बिल्डिंग मटेरियल सप्लायर प्रथम संजय बाळबुधे (वय २३) यांचा ट्रॅक्टर २३ मार्च २०२६ रोजी रात्री १०:३० च्या सुमारास मजुरांना सोडण्यासाठी उसेगाव येथे गेला होता. यावेळी आरोपी शादुल पचारे, विलास मोहिनकर, शुभम रणदिवे, संजय नागदेवते आणि जितेंद्र घाडगे यांनी पांदण रस्त्यात ट्रॅक्टर अडवला. "तू अवैध रेतीचा व्यवसाय करतोस, तुझा ट्रॅक्टर तहसीलदारांना बोलावून जप्त करायला लावतो," अशी धमकी देत त्यांनी १५,००० रुपयांची खंडणी मागितली.
मदतीला धावले गावकरी:
ट्रॅक्टर रिकामा असल्याने फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला आणि गावातील नागरिकांना मदतीसाठी बोलावले. ८ ते १० नागरिक घटनास्थळी पोहोचताच आरोपींनी तेथून पळ काढला. मात्र, दुसऱ्या दिवशी २४ मार्च रोजी सकाळी आरोपींनी पुन्हा फिर्यादीला फोन करून धमकावण्यास सुरुवात केली. आरोपी हे युट्यूब आणि साप्ताहिक चालवत असल्याने, त्यांच्या त्रासाला कंटाळून आणि बदनामीच्या भीतीने फिर्यादीने त्यांना ऑनलाईन माध्यमातून ५,००० रुपये दिले.
पोलिसात तक्रार आणि कारवाई:
सततच्या त्रासानंतर फिर्यादी प्रथम बाळबुधे यांनी चिमूर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत आरोपी शादुल पचारे, विलास मोहिनकर, शुभम रणदिवे, संजय नागदेवते आणि जितेंद्र घाडगे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८ (२), १२६ (२) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे आणि ठाणेदार दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल बारपात्रे करीत आहेत.

