Tiger Attack: वाघाचा जबडा आणि मृत्यूचा थरार!

Bhairav Diwase
सरपण गोळा करणाऱ्या महिलेचा जागीच मृत्यू
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी वनपरिक्षेत्रातून सावरला जंगलात वाघाने केलेल्या भीषण हल्ल्यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे सावट पसरले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, तळोधी बाळापूर येथील चिटणीसपुरा भागातील रहिवासी असलेल्या ४६ वर्षीय प्रेमिला अरुण वाडगुरे या आज सकाळी नेहमीप्रमाणे इतर महिलांसोबत सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. सावरला तलावाजवळील कक्ष क्रमांक ८९ मध्ये काम सुरू असताना, सकाळी पावणे आठच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने प्रेमिला यांच्यावर झडप घातली.


हा हल्ला इतका भीषण होता की, प्रेमिला यांचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेल्या महिलांनी आरडाओरडा केल्यावर वाघ जंगलात पसार झाला, मात्र या घटनेने प्रत्यक्षदर्शी महिलांच्या मनात धडकी भरली आहे.


घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. वनविभागाचे पथक तातडीने दाखल झाले असून त्यांनी पंचनामा केला आहे. दरम्यान, या परिसरात नरभक्षक वाघाचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. 'आम्ही सुरक्षित कधी होणार?' असा सवाल आता विचारला जात आहे. वनविभागाने परिसरात गस्त वाढवली असून नागरिकांना जंगलात न जाण्याचे आवाहन केले आहे.