Chandrapur police: महाकाली यात्रा आणि रामनवमीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरात पोलिसांचा भव्य 'रूट मार्च'

Bhairav Diwase
चंद्रपूर:- ऐतिहासिक माता महाकाली यात्रा आणि श्री. रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, चंद्रपूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने २५ मार्च २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास भव्य 'रूट मार्च'चे आयोजन करण्यात आले. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली हे संचलन पार पडले.


हा रूट मार्च माता महाकाली यात्रा नगरी (गौतम नगर) येथून सुरू झाला. त्यानंतर अंचलेश्वर गेट, गिरनार चौक, मुख्य मिरवणूक मार्ग असलेल्या गांधी चौक, जयंत टाकीज चौक, मौलाना आझाद चौक, छोटी मस्जिद आणि पुन्हा गिरणार चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या संचलनाचा समारोप झाला.


या रुट मार्चमध्ये केवळ पोलीस दलच नव्हे, तर महानगरपालिका प्रशासनानेही सक्रिय सहभाग नोंदवला. यामध्ये प्रामुख्याने मनपा आयुक्त अनुकुरी नरेश, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले आणि मनपा उपायुक्त संदीप चिद्रवार यांची प्रमुख उपस्थिती होती.


सण-उत्सवाच्या काळात शहरात सुरक्षिततेचे वातावरण राहावे, या उद्देशाने काढण्यात आलेल्या या मार्चमध्ये ०३ पोलीस निरीक्षक, २२ पोलीस अधिकारी, १५० पोलीस कर्मचारी, २०० पुरुष व महिला होमगार्ड (गृहरक्षक) अशा एकूण ३०० ते ३२५ जवानांच्या ताफ्याने शहरात संचलन केले.

या रूट मार्चच्या माध्यमातून पोलिसांनी नागरिकांना निर्भयपणे सण साजरे करण्याचे आवाहन केले असून, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करण्याचे विनंती केली आहे.