चंद्रपूर:- दुर्गापूर पोलीस ठाण्याचे वादांच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस निरीक्षक संदीप एकाडे यांना अखेर पोलीस प्रशासनाने बदलीचा कडक डोस दिला आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अचानक आदेश काढत एकाडे यांची दुर्गापूरहून थेट चंद्रपूर पोलीस नियंत्रण कक्षात बदली केली. या तडकाफडकी निर्णयामुळे जिल्ह्यातील पोलीस वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गापूर पोलीस ठाण्यातील मालमत्ता विक्री, अंतर्गत कारभारातील कथित अनियमितता आणि काही कर्मचाऱ्यांशी वादग्रस्त वर्तन याबाबत एकाडे यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील आणि पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी यापूर्वीच या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागविला होता.
या पार्श्वभूमीवर एकाडे यांना डिफॉल्ट नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर आज अचानक प्रशासनाने निर्णय घेत दुर्गापूर पोलीस ठाण्यातून त्यांची बदली करत नियंत्रण कक्षात रवानगी केली. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात दोनदा कंट्रोल रूममध्ये बदली होणारे संदीप एकाडे हे पहिलेच ठाणेदार ठरल्याची चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे ही कारवाई केवळ प्रशासकीय नसून आगामी काळात आणखी मोठी प्रशासकीय कारवाई होण्याचे संकेत असल्याचीही चर्चा जोर धरत आहे.

