चंद्रपूर:- चंद्रपूरचं प्रदूषण आता कोणत्या थराला गेलंय, याचं जिवंत उदाहरण पाहायला मिळालं. राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे चंद्रपूर दौऱ्यावर आहेत. मात्र, या दौऱ्यात त्यांच्या लक्झरी गाडीची जी अवस्था झाली, ती पाहून प्रशासन हादरलं आहे. अवघ्या काही तासांत मुंडेंची पांढरीशुभ्र गाडी कोळशाच्या धुळीने पुरती काळवंडून गेली.
शहरालगत असलेल्या महामाया कोल वॉशरी आणि विदर्भ मिनरल उद्योगांना पंकजा मुंडे यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार सुधीर मुनगंटीवार आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. चंद्रपूरकरांना श्वास घेणं कठीण करणाऱ्या या उद्योगांच्या कामकाजाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. हवेतील उडणारी ही काळी धूळ केवळ मंत्र्यांच्या गाड्यांवरच नाही, तर स्थानिकांच्या फुफ्फुसातही शिरत असल्याच्या तक्रारी यावेळी मांडण्यात आल्या.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आपल्या कर्तव्यात कसूर करत असून ते 'मनमर्जीने' वागत असल्याचा मुद्दा लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला. यावर पंकजा मुंडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. "सध्या अधिकाऱ्यांना सुधारण्यासाठी वेळ देत आहे, पण त्यानंतर थेट कारवाईचा बडगा उगारला जाईल," अशी तंबी त्यांनी दिली.
पर्यावरण मंत्र्यांच्या गाडीवर दिसलेला हा 'प्रदूषणाचा डाग' आता तरी प्रशासनाचे डोळे उघडणार का? आणि चंद्रपूरकरांना या काळ्या धुळीपासून मुक्ती मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
"मी स्वतः संवेदनशीलतेने चंद्रपुरात पोहोचून या प्रश्नाची माहिती घेत आहे. येथील परिस्थिती गंभीर आहे. प्रदूषणावर केवळ तात्पुरती मलमपट्टी नको, तर दीर्घकालीन उपाययोजना करण्यावर आमचा भर असेल. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही."
ना. पंकजा मुंडे पर्यावरण मंत्री, महाराष्ट्र राज्य


