Tadoba Viral video: ताडोबातील वाघाच्या 'पाणवठ्यावर' प्लास्टिकचा विळखा

Bhairav Diwase

चंद्रपूर:- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प... जिथे वाघाची एक झलक पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक गर्दी करतात. पण याच व्याघ्र प्रकल्पातून आता एक संतापजनक आणि विदारक वास्तव समोर आले आहे. ज्या पाणवठ्यावर वाघ आपली तहान भागवण्यासाठी येतो, तिथेच मानवी हस्तक्षेपाचे आणि बेजबाबदारपणाचे 'प्लास्टिक' पडलेले पाहायला मिळत आहे.

हे दृश्य आहे चंद्रपुरातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील 'केसलाघाट' बफर झोनमधील एका पाणवठ्याचे. वन्यजीव छायाचित्रकार रणवीरसिंग गौतम यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, वाघाचे अस्तित्व असलेल्या या अत्यंत संवेदनशील क्षेत्रात प्लास्टिकच्या बॉटल्स आहेत.


खरं तर, व्याघ्र प्रकल्पात प्लास्टिक नेण्यास सक्त मनाई आहे. मग तरीही या बॉटल्स इथपर्यंत पोहोचल्याच कशा? हा प्रश्न आता वन्यजीव प्रेमी विचारत आहेत. पर्यटकांचा हा बेजबाबदारपणा केवळ निसर्गासाठीच नाही, तर प्रत्यक्ष वाघाच्या जीवासाठीही घातक ठरू शकतो. वनविभागाच्या अशा प्रकारच्या ढिसाळ कारभारामुळे वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येत आहे.