चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून औद्योगिक प्रदूषणाचा प्रश्न तापलेला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. ज्या मंत्र्यांकडे प्रदूषण रोखण्याची जबाबदारी आहे, त्यांच्याच दौऱ्याला महामाया कोल वाशरीने चक्क 'प्रदूषणाची सलामी' दिली आहे.
प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाकडून कितीही दावे केले जात असले, तरी जमिनीवरची परिस्थिती किती भयानक आहे, याचे जिवंत उदाहरण पाहायला मिळाले. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या जेव्हा महामाया कोल वाशरी परिसरातून जात होत्या, तेव्हा संपूर्ण परिसरात कोळशाची धूळ आणि काळा धूर पसरलेला होता. परिस्थिती इतकी गंभीर होती की, मंत्र्यांच्या ताफ्यातील चकचकीत वाहने अवघ्या काही वेळातच धुळीने माखली आणि काळी पडली.
विशेष म्हणजे, मंत्र्यांचा दौरा असल्यामुळे कोल वाशरी व्यवस्थापनाने सर्व काही 'आलबेल' असल्याचे दाखवण्याची जय्यत तयारी केली होती. मात्र, निसर्गाच्या आणि वास्तवाच्या ओघापुढे ही लपवाछपवी टिकू शकली नाही. वाशरीतून बाहेर पडणाऱ्या धुराने आणि कोळशाच्या थराने मंत्र्यांचे स्वागत केल्याने उपस्थित अधिकारी आणि व्यवस्थापनाची मोठी धांदल उडाली.
जर मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी ही परिस्थिती असेल, तर सामान्य जनता दररोज कोणत्या नरकात जगतेय, असा सवाल आता स्थानिक नागरिक विचारत आहेत. या घटनेनंतर आता पर्यावरण मंत्री संबंधित कोल वाशरीवर काय कठोर कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


