चंद्रपूर:- निसर्गाच्या लहरीपणाचे आणि वन्यजीवांच्या वर्चस्वाचे अनेक थरार आपण आजवर पाहिले असतील. पण चंद्रपूरच्या कारवा जंगलात जे घडलं, ते पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. ऐन सायंकाळच्या वेळी पाणवठ्यावर तहान भागवण्यासाठी आलेल्या दोन अस्वलानंमध्ये अचानक जुंपली. ही नुसती चकमक नव्हती, तर एक महायुद्ध होतं...
तारीख १५ एप्रिल, वेळ सायंकाळची... चंद्रपूर शहराजवळ असलेल्या 'कारवा' वनक्षेत्रात पर्यटकांची सफारी नेहमीप्रमाणे सुरू होती. उष्णतेचा पारा वाढल्याने वन्यजीव पाण्याच्या शोधात पाणवठ्याकडे येत आहेत. अशातच दोन अजस्त्र अस्वल एकाच वेळी पाणवठ्यावर समोरासमोर आले. वर्चस्वाच्या वादातून म्हणा किंवा पाण्याच्या ओढीने, या दोन्ही अस्वलांनी एकमेकांवर भीषण हल्ला चढवला.
अस्वलांचा तो भीषण आवाज आणि एकमेकांवर ओरडणे यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला होता. सफारीसाठी आलेल्या पर्यटकांना अस्वलांच्या झुंजीचा हा दुर्मिळ आणि तितकाच भीतीदायक अनुभव अगदी जवळून घेता आला.


